कविता टाईमपास नाही!
तर...
सर्वप्रथम सांगायचं म्हणजे कविता लिहिणं माझा छंद नाही. कविता लिहिणं माझी आवड नाही. कविता मला येत नाहीत वा माझ्याकडून पाडल्या जात नाहीत! टाईमपास म्हणून कविता कधीच लिहिली जात नाही. कविता लिहिताना कविता आहे काय? मी लिहिते का? असे विचार खरं तर डोक्यात आजवर कधी आले नाहीत. बरं! "कविता" नेमकी आहे काय? पूर्वसुरींनी, अभ्यासकांनी ह्या बयेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय पण ती काही हाती लागली नाही. मी ही बराच प्रयत्न करते तिच्या कक्षेत येण्याचा पण अजूनही ती मायेनं जवळ घेत नाही... भरून आलेलं आभाळ कागदावर बरसवायचं; शब्दांची बरसात अन् नंतर गोठून राहिलेला सावळगारवा अर्थ - कविता अशी असते का? कधी कधी असा विचार करून बघितलाय पण हाती गवसलं ते एवढंच; "कविता माझी बोली आहे, कविता माझी भाषा, कविता माझ्या जगण्याचा इतिहास तर कविता अस्तित्वाची संस्कृती आहे."
डिजिटल, टेक्नोसेवी पिढीची मी प्रतिनिधी. मी व्यक्त होऊ लागले ते स्क्रीनवर... अभिव्यक्ती दडपली जात असताना!
तेव्हा कवी म्हणून माझ्यावर आणखी दडपण आलं. मुळात मी साहित्याची विद्यार्थिनी. शब्दांची ताकद व शब्दांची हुकुमत आम्हाला चांगलीच ठाऊक असते. कविकुळात पाऊल ठेवण्यापूर्वी पूर्वसुरींची परंपरा, गट , प्रवाह, मतमतांतरे याबद्दल ऐकलं होतं. वाचलं होतं. नकळत त्यांचा परिणाम माझ्या लेखणीत उमटू लागला होता. कवी ग्रेस, पु.शि.रेगे, आरती प्रभू, इंदिरा संत, ना. धो.महानोर आदी कवींची शब्दकळा माझ्यात हळूहळू रूजू लागली होती! सोबत कवी मर्ढेकर, सदानंद रेगे, नारायण सुर्वे, अरूण कोलटकर, नामदेव ढसाळ, अरूण काळे या कवींना वाचून पछाडल्यासारखी झाले होते. या सर्वांचं संचित घेऊन मी लेखनाला सुरुवात केली.
मी ज्या काळात लिहितेय तो काळ सामाजिक, राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञानाच्या उलथापालथीचा आहे. ह्या महानगरात श्वास घेताना पुढच्याच्या घामाचा वास मागच्याच्या नाकात शिरतोय. शांतता इथं वस्तीला कधीच नाही. कधी धार्मिक तेढ, कधी जातीय संघर्ष, कधी वैचारीक तर कधी सांस्कृतिक गळचेपी, कधी प्रांतिक वाद, कधी अस्मितेचा प्रश्न कधी नोकरी टिकवण्याची धावपळ तर कधी लोकलमध्ये चौथ्या सीटसाठी मारामार !
या सगळ्यात माझ्यातल्या कवयित्रीला पोषक आहार मिळतो.
मला कवितेसाठी कधीच शब्दांची जमवाजमव करावी लागली नाही. मी अनुभवांना स्वतःत झिरपवून घेते. मग कधी रातराणी, कधी निशीगंध तर कधी बाभूळ बनून कविता आपसूकच कागदावर आकारते. मी स्वतःला पुस्तकांत शिणवते, समुद्रासमानात एक होऊ पाहते, कधी रस्त्यावर स्वतःला गोळ्या झाडून घेते, तर कधी माणसांच्या गर्दीत साफ बहिरी होऊन त्यांचं नग्न रूप सताड डोळ्यांनी बघत राहते. अचानक सभोवतालचं जिवंत जगणं चित्रवत वाटतं तर मध्येच आर्ट गॅलरीतल्या चित्रातलं पोर माझ्याशी बोलू लागतं. अशावेळी प्रसूतीपूर्व वेदना सणाणून उठतात, माझ्यातल्या कवयित्रीला नवनिर्मितीचा पान्हा फुटतो.
या सगळ्या पसा-यात एक स्त्री देह घेऊन बाहेर पडताना समोर येणारे प्रसंग तर मग काही औरच !
सिमोन म्हणते; "स्त्री ही जन्मत नाही तर घडवली जाते..."
स्त्री असण्याचा शारीरिक, लैंगिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा स्वतः सोबत वागवत असताना सिमोनच्या या वचनाचा पदोपदी प्रत्यय येतो. माझा भोवताल स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा करतो, स्त्री सबलीकरणाचा दावा करतो. स्त्री-पुरूष समानतेचा पुकारा करतो पण प्रत्यक्षात मात्र बाई ही भोगवस्तू ! हा दृष्टिकोन भल्याभल्यांच्या नजरेतून पुसला जात नाही. इथली पुरूषप्रधानता पदोपदी बाईचं माणूस असणं कात्रत जातेय. पुरूषी सत्तेने घडवलेली बाई, दुस-या बाईशी स्वतःच्या मासिक पाळीवर देखिल खुलेपणाने बोलत नाही. तेव्हा वयात येतानाच्या लाल रंगी ठिबक्यांचा कितेकजणी तिरस्कार करताना दिसतात... खुलेपणाने न बोलता आजही फक्त कुजबुजतात!
यावर अशीच एक कविता लिहिली गेली-
तेव्हा सारेच रंग क्षणात विस्कटले
आधीच ठरल्यासारखे
एकाने मात्र घात केला
लाल रंगाच्या साध्या ठिबक्याने
ओल्या पदरात श्रावण जाळला
सावध झाल्या सगळ्या नजरा
कोवळं तारूण्य उमलताना
एवढंच तर घडत होतं मी वयात येताना...
यातून वाट काढत असताना माझी कविता स्त्री असण्याचा गौरव करू लागते...
माझ्या भोवतालची स्त्री सक्षम आहे पण तिला तिचे जीवनमान ठरवता येत नाही. पर्यायाने तिला "स्व"बळावर जगता येत नाही.
तंत्रज्ञानाच्या युगात बोटांवर जग फिरवणारी स्त्री कित्येक व्हायरस ना बळी जाताना दिसते. माझी लेखणी अशा वेळी आपसूकच ताठ कण्याने माझ्या सोबत उभी राहते. पुरूषव्यवस्थेवर निव्वळ कोरडे न ओढता समानतेची साद देते.
समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय माझ्या कवितेच्या रक्तात भिनलेय. तिला कृत्रिम उदारता नाही सोसवत.
माझ्या कवितेची लिपीए
माणसाच्या जगण्याची,
माझ्या कवितेत वेदनाय
माणुसकीच्या मूकेपणाची
माझी कविता हुंकारते
जमीन भेगाळताना
कविता पेटून उठते
माय रक्ताळताना
माझी कविता तुला शोधते
आभाळ बरसताना
कविता मला सोसते
तुला सांधताना...
माझी कविता या व्यवस्थेच्या रेटारेटीत गुदमरते, भ्रष्ट उजेडात भोवंडते, थरथरते, शहारते, व्याकुळते..
पुन्हा उभी राहते...
लुकलुकते...
बोलू लागते...
माझी कविता या युगाच्या वर्तमानात जगतेय!
संवेदनांच्या समृध्दीत! नवनिर्मितीच्या मिजासीत!
माझी कविता नवसमाज घडवण्यासाठी मार्गक्रमण करतेय...
चालतेय.. चालतेय... चालतेय...
भाषेचं बोट धरून चालत आहे.
- वृषाली विनायक
१७ डिसें. २०१७
(अक्षरपेरणी या नियतकालाकासाठी मांडलेली भूमिका)
माझ्या कवितेची लिपीए माणसाच्या जगण्याची...हे आवडलं !!!
ReplyDeleteकविता मला सोसते,
ReplyDeleteतुला सांधताना
हे झकास आहे,
तुला स्वतःची भाषा गवसायला लागली आहे,
ब्लॉग जमलाय चांगला.
अभिनंदन
कवितेची लिपी माणसाच्या जगण्यातली आहे हे तुझ्या लेखातुन स्पष्ट होतं हे विशेष आहे तुझ्या लेखणीतलं
ReplyDeleteकविता टाईमपास नाही
कारण
कविता फक्त हातातुन नाही श्वासातुन घडत जाते
या तुझ्या श्वासातुन नवनिर्मिती होत राहो या साठी मनपुर्वक सदिच्छा
भाषेचं धरलेलं बोट जसं तुझ्याकडुन सुटणार नाही तसं भाषेकडुनही सुटणार नाही कारण माय लेकराचं बोट सोडत नसते...
भ्रष्ट उजेडात भोवंडते माझी कविता.. आजच्या सांस्कृतिक व राजकीय पर्यावरणातील पोकळ गप्पा व भयचकित वर्तनाबाबतचं अचूक भाष्य आपली कविता देते... खरंय वृषालीजी..!
ReplyDeleteटेक्नोसेवी पीढीची प्रतिनिधी हे आवाडलं...
ReplyDeleteसामाजिक उलतापालथीच्या चक्रावर लेखकांनी आपली लेखणी धारदार केली पाहिजे जे तुम्ही करता आहात...
बाहेरील जगाचा दबाव हा सामान्य माणसांच्या मेंदूपर्यंत असतो पण एखाद्या लेखकाच्या कविच्या मेंदूपासून संवेदना पर्यंत झिरपत जातो..मग हात लिहते होतात..लिहल्या नंतरच ती तळमळ थांबून आपण एका तटस्थ बिंदूला पोहचतो..आणि आपणच आपली समिक्षा करायला तयार होतो..
नवनिर्मीतीच्या वाटेवर मार्गक्रमण करताना शब्दांच बोट..हे अफाट आहे...
खूप छान..
आज नव्याने भूमिका मांडायला हवीय.ही २०१७ ची आहे.यात अधिक भर पडेल .वृृृृृृृषाली,गेल्या दोन वर्षात बर्याच गोष्टी केल्यात तू.वाचन लेखन आणि सर्जनाची साथ सतत असते तुझ्या."माझ्यातल्या कवयित्रीला नवनिर्मितीचा पान्हा फुटतो." हे आवडलं.लिहित रहा.आम्ही वाचत राहू.वृृृृृषाली,मनापासून शुभेच्छा !
ReplyDeleteमागे एका ग्रुपवर आपल्या २-३ भन्नाट ,लैंगिकतेकडे ( त्यात वावगे काहीच नाही ) झुकणाऱ्या कविता वाचल्या होत्या .
ReplyDeleteत्यानंतर आपल्या स्टेटस् वरून आत्ताच हा ब्लॉग आणि त्यातील कविता वाचल्या.
ब्लाॅग आवडला.य
थोडक्यात सांगतो-
ReplyDeleteतुझ्या लेखणीतून शाई नाही तर काळं रक्त झिरपतंय कवितेला नव्या युगाच्या अनुभवांचा एक नवा आयाम देणारं!लिहीत रहा जेव्हा जेव्हा जसं जसं जिथे जिथे सुचेल तसं!
छान मांडणी केली आहे।
ReplyDeleteवृषाली चांगली मांडणी आहे.
ReplyDeleteअगदी खरंय कविता टाईमपास नसते.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान 👍
ReplyDeleteकविता ही प्रत्येक कवीची एक भूमिका असते.सुंदर मांडले आहे.
ReplyDeleteकविता भवताल बदलण्यासाठी कॅटालिस्टप्रमाणे काम करते.कधी अंतर्मुख तर कधी पेटून उठायला लावते तर कधी समाधानाने तृप्त करते..भूमिका आवडली शुभेच्छा
कविता सहजासहजी मायेनं जवळ घेत नाही...मस्तच!
ReplyDeleteकविता सहजासहजी मायेनं जवळ घेत नाही...मस्तच!
ReplyDelete